हिमाचल प्रदेशमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. घुमरावी येथील एका तरुणाला पोटदुखीचा त्रास होत होता. यामुळे त्याला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तरुणाच्या पोटावर शस्त्रक्रिया करत दोन, दहा आणि वीस रुपयांची 33 नाणी बाहेर काढली.
तरुण मानसिक रुग्ण असून तो अनेक दिवसांपासून नाणी गिळत होता. तरुणाला 31 जानेवारी पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याची एन्डोस्कोपी आणि अन्य तपासण्या केल्यानंतर डॉक्टर हैराण झाले. तरुणाच्या पोटात नाणी आढळून आली.
डॉक्टरांनी तात्काळ तरुणाची शस्त्रक्रिया केली आणि पोटातून 2, 10 आणि 20 रुपयांची एकूण 33 नाणी बाहेर काढली. या नाण्यांचे वजन 247 ग्रॅम होते. सध्या तरुणाची प्रकृती स्थिर आहे.