टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या ‘रन’संग्रामाला अमेरिका व वेस्ट इंडीज यांच्या संयुक्त यजमानीत 2 जूनपासून प्रारंभ झाला. ही स्पर्धा सुरू होऊन दोन दिवसही उलटले नाहीत, तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी एक ऐतिहासिक घोषणा केली. कारण आता केवळ विजेते संघच नव्हे, तर वर्ल्ड कपमधील सर्वच 20 संघ मालामाल होणार आहेत. आयसीसीने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वोच्च बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये क्रिकेटपटूंवर एकूण 11.25 मिलियन अमेरिकन डॉलर इतक्या बक्षीस रकमेचा वर्षाव होणार आहे. यातील 2.45 मिलियन डॉलर रक्कम ही जगज्जेत्या संघाला मिळणार आहे. जगज्जेत्या संघाला मिळणारी ही स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम बक्षीस रक्कम होय. उपविजेत्या संघाला 1.28 मिलियन डॉलर इतके बक्षीस मिळणार आहे. याचबरोबर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱया संघांनाही प्रत्येकी 787.500 डॉलर पारितोषिक रक्कम मिळणार आहे. शिवाय सुपर-8 फेरीत आव्हान संपुष्टात येणाऱया संघांनाही 31.154 डॉलरचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर 9 ते 12व्या स्थानावर राहणाऱया संघांसाठी प्रत्येकी 247.500 डॉलर मिळणार आहेत. 13 ते 20व्या क्रमांकावर राहणाऱया प्रत्येक संघाला 225.000 डॉलर रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.