हाय व्होल्टेज विद्युत तारा तुटून शाळेच्या मैदानावर पडल्या,नगरमधील घटनेने खळबळ; मोठी दुर्घटना टळली

केडगावमधील महापालिकेच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मैदानावर मंगळवारी (दि. 4) सकाळी शाळा भरण्यापूर्वी महावितरणच्या हाय व्होल्टेज तारा तुटून खाली पडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. तर, महावितरणने शाळेच्या आवारातील विद्युत तारा तातडीने हटवाव्यात, अशी मागणी शाळेचे शिक्षक व पालकांनी केली आहे.

केडगावमधील मनपाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शाळेच्या मैदानावरून महावितरणच्या ‘हाय व्होल्टेज’ तारा गेल्या आहेत. मंगळवारी सकाळी शाळा भरण्याच्या आधी तारा तुटून मैदानावर पडल्या होत्या. ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबात त्वरित महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कळविले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी येत विद्युत पुरवठा बंद केला. शाळा सुरू असताना किंवा विद्यार्थी मैदानावर खेळत असताना ‘हाय व्होल्टेज’च्या तारा पडल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

महावितरणने तारा तुटण्याच्या अगोदर उपाययोजना करणे गरजेचे होते. आतातरी महावितरणच्या अधिकाऱ्याने तातडीने लक्ष घालून शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवाव्यात, अशी मागणी पालक-शिक्षकांनी केली आहे.