
अत्याधुनिक अशी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार असून यासाठी 31 मार्चची मुदत दिली आहे. सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्र, जुन्या वाहनधारकांनी लवकर अशा प्रकारची नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना 1 एप्रिल 2019 पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो. हाय सिक्युरिटी नंबरप्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी
नंबरप्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. एप्रिल 2019 नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ती अनिवार्य आहे. तसेच आता 2019 पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वीच हा निर्णय झाला असून त्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना ऑनलाइन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे.
जनजागृतीची गरज
■ जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी 31 मार्चची मुदत आहे. या मुदतीनंतर संबंधित विभागाकडून कारवाई होणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या निर्णयाची जनजागृती गरजेची आहे. जेणेकरून नागरिकांना पुरेसा कालावधी मिळून भविष्यातील कारवाई टळू शकेल.
नंबरप्लेटसाठीचे शुल्क
वाहनाचा प्रकार शुल्क
दुचाकी, ट्रॅक्टर 450
तीनचाकी 500
चारचाकी, अन्य वाहने 745