
वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत तत्काळ हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली होती. अखेर युवासेनेच्या मागणीला यश आले असून लवकरच येथे हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत सध्या बेस्टच्या माध्यमातून दिवे लावण्यात आले आहेत. या दिव्यांचा प्रकाश कमी असल्याने स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. याचा फायदा घेऊन येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार वरळी विधानसभेचे युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील यांनी नुकतेच जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांना निवेदन देऊन तत्काळ या स्मशानभूमीत हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मंगळवारी या स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली. ज्यामध्ये वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र काटकर, मुंबई महापालिकेचे सुरक्षा अधिकारी महाजन, जी दक्षिण विभागाचे अधिकारी अभिजित जोंधळे, आरोग्य विभागाचे अधिकारी भारिया तसेच युवासेनेचे उपविभाग अधिकारी अभिजित पाटील उपस्थित होते.