विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱया अनेक उमेदवारांचे किरकोळ तांत्रिक मुद्दय़ांवरून अर्ज बाद ठरवण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक इच्छुक उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी पाच याचिका न्यायालयाने फेटाळल्या. हा निर्णय देतानाच निवडणूक आयोगाला महत्त्वपूर्ण सूचना केली. उमेदवारी अर्ज योग्य पद्धतीने भरले जावेत या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारे व्हिडीओ टय़ुटोरिअल उपलब्ध ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला दिले.
निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्जातील किरकोळ तांत्रिक चुकांवर बोट ठेवून अर्ज फेटाळल्याने उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. याचिकाकर्त्यांमध्ये मुंबई, ठाणे, शहापूर, चिपळूण येथील उमेदवारांचा समावेश होता. त्यांच्या याचिकांवर न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक विस्कळीत होऊ देणार नसल्याचे मत नोंदवत उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या. मात्र निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज भरण्यासंबंधी मार्गदर्शन करणारे व्हिडीओ टय़ुटोरिअल उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
पुरेशी जनजागृती करण्याचे निर्देश
विधानसभा निवडणुकीला मोजके दिवस शिल्लक असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सविस्तर आदेश देण्यास नकार दिला. याचवेळी निवडणूक अधिकाऱयांच्या कार्यपद्धतीवर नाराजीचा सूर आळवला. आम्ही चुकीच्या गोष्टीकडे डोळेझाक करू इच्छित नाही. मात्र निवडणूक अधिकाऱयांना याचिकाकर्त्या उमेदवारांच्या अर्जाचा पुनर्विचार करण्यास सांगितले तर निर्धारित वेळेत निवडणूक प्रक्रिया कठीण बनेल, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज भरण्याबाबत पुरेशी जनजागृती करण्याचे निर्देश दिले.