छोटा राजनला मोठा दिलासा! हायकोर्टाकडून जामीन मंजूर, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी मोठा दिलासा मिळाला आहे. 2001 मध्ये मुंबईतील हॉटेल व्यवसायिक जया शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवलेल्या छोटा राजनला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली.

न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे आणि न्यायाधीश पृथ्वीराज चव्हा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर छोटा राजनला जामीन मंजूर केला. मात्र अन्य काही गुन्हेगारी प्रकरणातही छोटा राजन दोषी आढळलेला आहे. त्यामुळे जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी छोटा राजन तुरुंगातच राहील.

जया शेट्टी हत्या प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने 30 मे 2024 रोजी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला छोटा राजनने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही शिक्षा स्थगित करून जामीन मंजूर करावा अशी मागणी छोटा राजनने केली होती. यावर बुधवारी सुनावणी पार पडली.