रवींद्र वायकरांना न्यायालयाचे समन्स; अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेची सोमवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. याच वेळी मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्यासह इतर प्रतिवादींना समन्स बजावून 2 सप्टेंबरला म्हणणे मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. कीर्तिकर यांनी वायकर यांच्या खासदारकीला आव्हान दिले आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत हेराफेरी झाली आहे. अशा गैरमार्गाने निवडून आलेले मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांचा विजय अवैध घोषित करा, अशी मागणी करीत शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी अॅड. अमित कारंडे यांच्यामार्फत निवडणूक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यापुढे सुनावणी झाली. या वेळी अॅड. कारंडे यांनी याचिकेतील विविध मुद्दय़ांकडे लक्ष वेधले. त्याची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती मारणे यांनी रवींद्र वायकर यांच्यासह इतर प्रतिवादींना समन्स बजावले आणि 2 सप्टेंबरला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

याचिकेत काय म्हटलेय

अमोल कीर्तिकर हे ईव्हीएम मतांच्या मोजणीनंतर 1 मताने विजयी झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 333 टेंडर मतांचा घोळ घालण्यात आला.

‘फॉर्म -17 सी’नुसार 333 टेंडर मते नोंदवली होती, तर फॉर्म-20द्वारे जाहीर केलेल्या निकालपत्रानुसार 213 टेंडर मतांची नोंद करण्यात आली. या मतांच्या घोळाचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाला.

निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमांचे सरळसरळ उल्लंघन केले. त्यामुळे वायकर यांचा विजय अवैध ठरवून अमोल कीर्तिकर यांना विजयी घोषित करा.