पोटाला चिमटा देऊन, काबाडकष्ट करून पोटच्या चार मुलांचा एकटय़ा बाईने व्यवस्थितपणे सांभाळ केला. आई म्हणून मुलांना कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. संपूर्ण आयुष्य मुलांसाठी खर्ची घातले. परंतु उतारवयात चार मुले असूनही एकही मुलगा आईचा सांभाळ करण्यासाठी पुढे येत नाही. या चौघांनीही आईला वाऱ्यावर सोडले आहे. मी एकटाच आईचा सांभाळ का करू, असे म्हणत एका मुलाने तर चक्क हायकोर्टात धाव घेतली आहे.
हे प्रकरण जबलपूरमधील नरसिंगपूरमधील आहे. आईने मला कोणतीही मालमत्ता दिली नाही. त्यामुळे मी तिचा सांभाळ करू शकत नाही, असे मुलाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. यावर कोर्टाने मुलाला खडसावले असून पालकांचा सांभाळ करणे हे मुलाचे कर्तव्य आहे असे न्यायाधीश जी.एस. अहलुवालिया यांच्या एकल खंडपीठाने निर्देश दिले. जर याचिकाकर्ता जमिनीच्या कमी-जास्त वाटपामुळे नाराज असेल, तर त्याला दिवाणी खटला दाखल करण्याचा उपाय आहे. परंतु त्याला आईच्या देखभालीच्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही.
– आई-वडिलांनी मुलांना किती संपत्ती दिली, यावर किती भरतपोषण भत्ता द्यावा हे ठरत नाही. आई-वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी कोर्ट ट्रिब्युनल यांचा आदेश आणि एडीएमचा सुधारित आदेश कायम ठेवत आईला दर महिना 8 हजार रुपये म्हणजेच चार मुलांनी प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचा आदेश कायम ठेवला.