दुकाने 24 तास सुरू ठेवायला काय हरकत आहे! पोलिसांना उच्च न्यायालयाने सुनावले

चोवीस तास सात दिवस दुकान सुरू ठेवण्याची संकल्पना जगभरात प्रचलित असताना रात्री 11 नंतर दुकान बंद करण्याचा आग्रह करणाऱ्या पुणे पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. दुकाने चोवीस तास सुरू ठेवायला काय हरकत आहे? कायद्यानुसार त्यांच्यावर तशी कोणतीही बंदी नाही. उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवल्यास त्याचा फायदा ग्राहकांना होणार असून अर्थव्यवस्थेला ही चालना मिळणार आहे असे निरीक्षण नोंदवत 11 वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास भाग पाडू नका असे आदेश हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले.

पुण्यातील हडपसर भागात ऑक्सिलरेट प्रॉडक्ट एक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ‘द न्यू शॉप’ नावाचे दुकान असून कोणताही कायदा नसताना पोलीस बेकायदेशीरपणे आणि मनमानी पद्धतीने कंपनीला रात्री 11 वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास सांगत असल्याने याप्रकरणी दाद मागण्यासाठी कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना याप्रकरणी फटकारत जाब विचारला. खंडपीठाने आदेशात नमूद केले की महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना (सेवेचे नियमन आणि सेवा शर्ती) कायद्यांतर्गत सुविधा दुकानांना 24 तास आणि आठवडय़ाचे सातही दिवस चालू ठेवण्यास कोणतीही बंदी नाही. असे असताना रात्री दुकान बंद करण्याचा आग्रह कशासाठी केला जातोय? केवळ हुक्का बार, परमिट रूम, डान्स बार किंवा दारू देणाऱ्या रेस्टॉरंट्ससारख्या आस्थापनांसाठीच निर्बंध घालण्यात आले आहेत. 2020 साली, सरकारने सिनेमा हॉल 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली, असे असताना पोलिसांना याचिकाकर्त्यावर दुकान बंद करण्याबाबत निर्बंध लादण्याचे कोणतेही अधिकार नाहीत.

न्यायालयाने आदेशात काय म्हटले आहे

‘दुकान उशिरापर्यंत सुरू राहिल्यास ग्राहकांना खरेदी करण्यासाठी सुविधा मिळते, विशेषतः ज्यांचे कामाचे तास सामान्य नसतात त्यांच्यासाठी, खरेदी करण्यासाठी लवचिक संधी निर्माण होते,’ असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. ग्राहकांनी दुकानात सामान खरेदी केले तर अर्थव्यवस्थेला चालना मिळते, तसेच अतिरित्च रोजगाराच्या संधी निर्माण होतात, जे आपल्यासारख्या मोठय़ा देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असून येथे बेरोजगारी हे एक मोठे आव्हान आहे.