ऑ़डिटोरियममधील आवाजाचा त्रास नागरिकांना होऊ देऊ नका, हायकोर्टाने नवी मुंबई महापालिकेला बजावले

जुईनगर येथील ऑडिटोरियममधील आवाजाचा नाहक त्रास तेथील रहिवाशांना होऊ देऊ नका, अशी सक्त ताकीद उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिली आहे.

मुख्य न्यायाधीश अलोक अराधे व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. हे ऑडिटोरियम तोडण्याचे आदेश आम्ही देऊ शकत नाही. मात्र येथे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटकोरपणे पालन केले जाईल याची काळजी पालिकेने घ्यावी, असा सज्जड दम न्यायालयाने दिला आहे.

कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक 

या ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास संबंधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असेल. आयोजकांनी आवाजाच्या नियमांचे पालन करायलाच हवे. नियमांचे पालन न झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असेही न्यायालयाने बजावले आहे.

नीलेश भोईर यांनी ही याचिका केली होती. जुईनगर येथील सेक्टर-23 येथे ऑडिटोरियम उभारण्याचा ठराव 4 जून 2018 मध्ये पालिकेने मंजूर केला. त्यानुसार येथे ऑडिटोरियम बांधण्यात आले. रात्रीच्या वेळेस येथे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जात नाही. येथील मोठय़ा आवाजाचा स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास होतो. झोपमोड होते. त्यामुळे हे ऑडिटोरियम उभारण्याचा ठराव रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.