हायकोर्टाने इशारा देताच एलआयसी ताळ्यावर, ग्राहकाला दिले साडेतीन लाख रुपये

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एलआयसीला विमाधारकाचे पैसे ठकवल्याप्रकरणी हायकोर्टाने दणका दिला आहे. विमाधारकाला मॅच्युरिटीचे पूर्ण पैसे देण्यास टाळाटाळ केल्याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने एलआयसीला कारवाईचा इशारा दिला. त्यानंतर ताळय़ावर आलेल्या एलआयसीने विमाधारकाला पॉलिसीचे साडेतीन लाख देण्याचे मान्य करत आठवडाभराच्या आत ते पैसे दिले. न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे विमाधारकाला दिलासा मिळाला आहे.

सायरस सुखेसवाला यांनी एलआयसीची जीवन सरल पॉलिसी विथ प्रॉफिट्स ही विमा पॉलिसी 15 वर्षांसाठी काढली. वर्षाला 30 हजार 64 याप्रमाणे पंधरा वर्षांचे साडेचार लाख 960 रुपये त्यांनी भरले. त्यांना यातून पाच लाख रुपये अतिरिक्त मॅच्युरिटी मिळणार होती, मात्र एलआयसीने त्यांना 2018 साली पत्र पाठवत पाच लाखांऐवजी एक लाख 97 हजार 580 रुपये देण्यात येणार असल्याचे सांगितले

याप्रकरणी सायरस यांनी अॅड. हरेक्रिष्ण मिश्रा यांच्यामार्फत याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती गिरीश पुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने याचिकेची दखल घेत एलआयसीला याप्रकरणी जाब विचारला. इतकेच नव्हे तर, आम्ही कारवाईचे आदेश देऊ अशी तंबी एलआयसीला दिली.