
पत्नीला देखभाल खर्च न देणाऱ्या पतीला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या पतीला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षाच न्यायालयाने सोमवारी सुनावली.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. वारंवार निर्देश देऊनही पतीने पत्नीला देखभाल खर्च दिला नाही. हा न्यायालयाचा अवमान आहे. पतीने न्यायालयाचा अवमान केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्याला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले.
ही शिक्षा ठोठावल्यानंतर पतीला कोर्ट रुममध्येच ताब्यात घेण्याचे आदेश खंडपीठाने पोलिसांना दिले. तसेच कोर्टातूनच पतीला शिक्षा भोगण्यासाठी घेऊन जा, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले.
सहा महिने कारावासाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी विनंती पतीने केली. पतीने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. परिणामी शिक्षेच्या आदेशाला स्थगिती देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हे दांपत्य डॉक्टर आहे. पतीने पत्नी व मुलीला दरमहा 35 हजार रुपये देखभाल खर्च द्यावा, असे आदेश न्यायालयाने 2019 मध्ये दिले. तरीही पती देखभाल खर्च देत नव्हता. त्यामुळे पत्नीने न्यायालयाच्या अवमानतेची याचिका पतीविरोधात दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने पतीविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची नोटीस जारी केली होती.