आयआयटीच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे हटवा, उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश

विविध प्रकल्पांवर संशोधन करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या जमिनीवर अतिक्रमण करत त्यावर बांधकाम उभारल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. ही बेकायदा बांधकामे हटविण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने सरकारला दिले.

आयआयटी मुंबईच्या जागेवर अतिक्रमण करून त्यावर बेकायदा बांधकामे उभारल्याप्रकरणी शब्बीर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने वाढत्या अनधिकृत बांधकामांबाबत नाराजी व्यक्त करत सरकारला फटकारले. तसेच सदर बांधकामे जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले. बांधकामे हटवताना आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरवण्याच्या सूचना न्यायालयाने या वेळी सरकारला केल्या.