
कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे लोकांना सांगा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी केली. ठाणे येथील एका अवैध मशिदीवर कारवाई करताना विरोध झाला. त्यामुळे मशिदीवर कारवाई करता आली नाही, असे ठाणे महापालिकेने न्यायालयाला सांगितले. न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने यावर संताप व्यक्त केला.
कायद्याचे पालन करणार नाही, असा दावा करत कोणीही आंदोलनाचे हत्यार उगारू शकत नाही. कायद्याचे पालन न करणाऱ्यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही, असे लोकांच्या डोकात पोलिसांनी व प्रशासनाने टाकायला हवे, असे खंडपीठाने नमूद केले.
मशिदीवर कारवाई करताना आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध करणार नाही, अशी ग्वाही मशीद ट्रस्टच्या सदस्यांनी खंडपीठासमोर दिली. मशीद तोडल्यानंतर त्या जागेवर कोणतेही अन्य बांधकाम करू नका, असे न्यायालयाने बजावले आहे.
या मशिदीचा काही भाग पाडण्यात आला आहे. उर्वरित मशीद रमजान संपल्यावर पाडली जाईल, अशी हमी ठाणे पालिकेने न्यायालयात दिली.