केक कापणे, फटाके फोडणे गुन्हा नाही; हायकोर्टाने रद्द केले आरोपीचे स्थानबद्धतेचे आदेश

एकत्र येऊन केक कापणे, फटाके  फोडणे हा काही गुन्हा नाही, असा निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीविरोधात जारी केलेले स्थानबद्धतेचे आदेश रद्द केले.

ही सर्व कृती दहशत पसरवण्यासाठी होती हे सिद्ध होणे आवश्यक आहे. अन्यथा हा प्रकार गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या आरोपीने खंजीरने केक कापला होता. त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते. त्यांनी फटाके फोडले होते. त्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर स्थानबद्धतेचे आदेश जारी करण्यात आले.

रबजोतसिंग तिवाना असे या आरोपीचे नाव आहे. 29 मार्च 2024 रोजी नांदेड जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी तिवानाविरोधात स्थानबद्धतेचे आदेश जारी केले. गृह विभागाने या आदेशावर शिक्कामोर्तब केले. त्याला तिवानाने याचिकेद्वारे आव्हान दिले होते. हे दोन्ही आदेश न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठाने रद्द केले.

पोलिसांचा दावा

तिवानाविरोधात जारी केलेले आदेश योग्यच आहेत. तिवानाची विभागात दहशत आहे. त्याच्याविरोधात तक्रार करायला कोणी पुढे येत नाही. त्यातूनही दोघांनी दिलेला जबाब इन पॅमेरा नोंदवण्यात आला. त्या आधारावर स्थानबद्धतेची कारवाई झाली, असा दावा अतिरिक्त सरकारी वकील जी. ए. कुलकर्णी केला.

तलवार, खंजीर ठेवायचा

तिवाना नेहमी सोबत तलवार, खंजीर व पिस्तूल ठेवायचा. त्याला अन्य कायदेशीर मार्गाने प्रतिबंधित करणे कठीण होते. त्यामुळे स्थानबद्धतेचे आदेश जारी करण्यात आले, असे नांदेड न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

तिवानाचा युक्तिवाद

तिवानाविरोधात अनेक गुह्यांची नोंद आहे. यांपैकी केवळ इटवारा पोलीस ठाण्यात नोंद असलेला व्हायरल व्हिडीओचा गुन्हा हे आदेश जारी करताना ग्राह्य धरण्यात आला. मात्र या गुह्याचा तपास प्रलंबित आहे. स्थानबद्धतेचे आदेश जारी करताना कोणत्या विभागात कोणते शस्त्र प्रतिबंधित करण्यात आले आहे हे पोलिसांनी स्पष्ट करायला हवे. ही कार्यवाही पोलिसांनी केलेली नाही. साक्षीदारांच्या जबाबाची प्रत तिवानाला देण्यात आलेली नाही. हे आदेश बेकायदा ठरतात, असा युक्तिवाद अॅड. एस. एस. गंगाखेडमर यांनी केला.