मुलाला घराचा ताबा सोडावा लागणार; विक्री करार केला अमान्य, हायकोर्टाचा ज्येष्ठ नागरिकाला दिलासा

वडिलांच्या घरावर मालकी हक्काचा दावा करणाऱ्या मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. संबंधित घरावर वडिलांचा अधिकार आहे, असे न्यायालयाने मुलाला बजावले आहे.

दिनेश केसाळे असे या मुलाचे नाव आहे. संबंधित घर रिकामी करण्याचे व त्या घरात न जाण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक देखभाल प्राधिकरणाने केसाळे यांना दिले होते. त्याविरोधात त्यांनी याचिका दाखल केली. न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. प्राधिकरणाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही, असा युक्तिवाद सरकारी वकील कविता सोळुंके यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने केसाळे यांची याचिका फेटाळून लावली.

याचिका फेटाळण्याच्या निकालाला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती केसाळे यांनी केली, मात्र केसाळे यांनी घर रिकामी केले आहे. निकालाला अंतरिम स्थगिती देऊन काही साध्य होणार नाही, असे सरकारी वकील सोळुंके यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

न्यायालयाचे निरीक्षण

वडिलांनी नातवाला घर विकले आहे. रीतसर दोन लाख रुपये देऊन हा व्यवहार झाला आहे, असे सांगत दिनेश यांनी घरावर हक्क सांगितला होता. तो न्यायालयाने मान्य केला नाही. नातू 20 वर्षांचा असताना विक्री व्यवहार झाला आहे. त्यावेळी नातवाने आजोबांना दोन लाख रुपये दिले असतील हे विश्वासार्ह नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.