
पैलवान नागेश कराळेच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पुण्यात भररस्त्यात गोळ्या झाडून कराळेची हत्या करण्यात आली होती.
चाकण येथे 24 डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका गिरीश कराळे यांनी दाखल केली होती. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या गुह्याचा तपास चाकण पोलिसांनी केला आहे. याचे आरोपपत्रही दाखल झाले आहे. यात हस्तक्षेप करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही, असे नमूद करत खंडपीठाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. राजकीय वादातून ही हत्या झाली आहे. या हत्येच्या सुपारीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राजकीय दबावामुळे चाकण पोलिसांनी याचा योग्य प्रकारे तपास केलेला नाही. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
खटल्याला उशीर होईल
ही घटना चार वर्षांपूर्वीची आहे. याचे आरोपपत्र दाखल झाले आहे. आता हा तपास सीबीआयकडे सोपवला तर खटल्याला उशीर होईल. याचा लाभ आरोपींना होऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
याप्रकरणात राष्ट्रीय हित नाही. आधीच आमच्यावर कामाचा ताण असून मनुष्यबळदेखील कमी आहे. तसेच आम्ही तपास करावा असा कोणताही मुद्दा या हत्येत नाही, असा दावा सीबीआयने न्यायालयात केला होता. या हत्येचा तपास योग्य प्रकारे झाला आहे. 45 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत. याचे आरोपपत्र दाखल झाले आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी न्यायालयाला दिली.