दफनभूमी भूखंड हडप प्रकरणात ठाण्यातील मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरनाईक यांच्या बालाजी इंटरप्रायझेस कंपनीला याचिकेत प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्याला दिली. त्याचबरोबर लाटलेला दफनभूमीचा भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश ठाणे महापालिकेला दिले.
घोडबंदर रोड, भाईंदर पाडा येथे 37 हजार चौ. फूट भूखंड पालिकेने ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित केला होता. मात्र राजकीय दबावाद्वारे पालिका अधिकाऱयांना हाताशी धरून भूखंडाचे आरक्षण उठवले तसेच रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी भूखंड देऊ केला. मात्र ख्रिश्चन बांधवांनी याला विरोध करत मूळ आरक्षित भूखंडावर दफनभूमी उभारावी अशी मागणी करत मेलविन फर्नांडिस यांनी अॅड. सुनीता बनीस यांच्यामार्फत याचिका दाखल केली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने या याचिकेतून विहंग ग्रुप ऑफ कंपनीजला याचिकेतून वगळण्यास परवानगी दिली तर सरनाईक यांच्याच बालाजी इंटरप्रायझेस व नगरविकास विभागाला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.
भूखंडाभोवती कुंपण उभारा
प्रताप सरनाईक यांच्या बालाजी इंटरप्रायझेस या कंपनीने बळकावलेल्या भूखंडावर पार्किंग व बगीचा उभारण्यात आला आहे. कंपनीला हा ताबा सोडावा लागणार असून ठाणे पालिकेला भूखंड ताब्यात घेण्याचे व त्याभोवती कुंपण उभारण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यातील इतर दफनभूमींच्या जागेवर असलेली अतिक्रमणे हटवण्याचे आदेशही न्यायालयाने पालिकेला दिले.