वडिलांच्या झोपडीमुळे मुलगा पुनर्वसनासाठी ठरला अपात्र, हायकोर्टाने नव्याने निर्णय घेण्याचे एसआरएला दिले आदेश

वडिलांची झोपडी असल्याने मुलाची स्वतंत्र झोपडी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने अपात्र ठरवली. उच्च न्यायालयाने प्राधिकरणाचा हा आदेश रद्द करत यावर नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले. अंधेरी पश्चिम येथील हे प्रकरण आहे. पुनर्विकासासाठी येथील झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात वडिलांची झोपडी पात्र ठरली. मुलाची झोपडी अपात्र ठरली. याविरोधात मुलाने तक्रार निवारण कक्षाकडे दाद मागितली. एका कुटुंबाची एकच झोपडी पात्र ठरते. तसा प्राधिकरणाचा नियम आहे, असे नमूद करत कक्षाने मुलाचा दावा नाकारला.

कक्षाच्या या निर्णयाला मुलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. माझी झोपडी स्वतंत्र आहे. या झोपडीचा मी मालक आहे. याची सर्व कागदपत्रे मी सादर केली. तरीही प्राधिकरण व तक्रार निवारण कक्षाने माझी झोपडी अपात्र असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय रद्द करून माझी झोपडी पात्र करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी मुलाने केली. त्याची नोंद करून घेत याबाबत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.

झोपडी विकत घेतली

मी झोपडी विकत घेतली आहे. खरेदी-विक्रीचा करार केला आहे. त्याची प्रत प्राधिकरणासमोर सादर केली आहे, असे मुलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.