
वसई-विरार शहरात बेकायदा बांधकामांना पेव फुटले असून भूमाफियांनी सरकारी जागासुद्धा बळकावल्या आहेत. नालासोपारा येथील बेकायदा बांधकामांची गंभीर दखल घेत हायकोर्टाने आज याप्रकरणी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना बांधकाम अनधिकृत आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
नालासोपारा पूर्व आचोळे येथे सरकारी जमीन लाटत भूमाफियांनी त्यावर अनधिकृत इमारत उभारली आहे. या बेकायदा बांधकामांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने श्री गणेशाय सेवा संस्था व इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. अटल बिहारी दुबे यांनी सांगितले की, ही बेकायदा बांधकामे पालिका तसेच सरकार पाठीशी घालत आहे. न्यायालयाने याची दखल घेत सरकारला जाब विचारला त्यावेळी याचिकाकर्तेदेखील अनधिकृत घरात राहत असल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले.