जखमी चालकाला नुकसानभरपाई द्या! हायकोर्टाचे विमा कंपनी, रिक्षा मालकाला आदेश

रस्ते अपघातात जखमी होऊन अपंगत्व आलेल्या रिक्षाचालकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विमा कंपनी व रिक्षा मालकाला दिले आहेत.

कामगार नुकसानभरपाई आयुक्तांनी रिक्षा चालकाला नुकसानभरपाई नाकारली होती. त्याविरोधात या रिक्षाचालकाने न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्या. शर्मीला देशमुख यांच्या एकलपीठासमोर यावर सुनावणी झाली.

रिक्षाचालक व मालकाचे नाते मालक व कामगाराचे असल्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. वाहनाच्या विम्याचा हफ्ता भरला जात होता. चालकाच्या अपघात विम्याचे अतिरिक्त पैसे दिले जात होते. तरीही विमा कंपनी चालकाला नुकसानभरपाई देण्यास बांधील नाही हा आयुक्तांचा निष्कर्ष अयोग्य आहे, असे न्या. देशमुख यांनी स्पष्ट केले.

15 वर्षांनंतर भरपाई 

संजय गुप्ता, असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तो एका रिक्षा मालकाकडे वेतनावर काम करत होता. ऑक्टोबर-2010 मध्ये रिक्षा चालवताना त्याचा अपघात झाला. या अपघातात त्याला 64 टक्के व्यंगत्व आले. नुकसानभरपाईसाठी त्याने आयुक्तांकडे अर्ज केला. हा अर्ज नामंजूर झाला, मात्र उच्च न्यायालयाने गुप्ताचा नुकसानभरपाईचा दावा मान्य केला.

z आयुक्तांच्या आदेशात आम्ही दुरुस्ती करत आहोत. विमा कंपनी व रिक्षा मालकाने गुप्ताला 7 लाख 48 हजार रुपयांची भरपाई द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.