मालाडमधील सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवा, जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचे आदेश

मालाडच्या आकसा येथे सरकारी भूखंड बळकावण्यात आला असून त्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग सुरू करण्यात आल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना सरकारी जागेवर अतिक्रमण आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मालाड पश्चिम आकसा येथील सिटी सर्व्हे क्रमांक 98 येथे कांसारी माता आदिवासी विकास संस्थेने सरकारी जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावा करत नागरिक सेवा सुधार समिती संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद उस्मान शेख यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या भूखंडावर पे अँड पार्क चालवण्यात येत असून कांसारी माता आदिवासी विकास संस्थेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान अनधीकृत बांधकाम काढण्याचे आदेश दिले.