अपघातात अंधत्व आलेल्या डॉक्टरला 83 लाखांची नुकसानभरपाई, हायकोर्टाचे आदेश

अपघातामुळे अंधत्व आलेल्या महिला डॉक्टरला तब्बल 83 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विमा पंपनीला दिले आहेत. 2005मध्ये झालेल्या अपघातात या महिला डॉक्टराला अंधत्व आले. आतापर्यंत तिचे अपेक्षित उत्पन्न काय असेल याची बेरीज करून न्यायालयाने ही भरपाई दिली आहे.

माधवी सहस्रबुद्धे असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. मोटार अपघात दावा प्राधिकरणाने माधवी यांना 2 लाख 89 हजार रुपयांची भरपाई दिली होती. 12 सप्टेंबर 2019मध्ये दिलेल्या नुकसानभरपाईविरोधात माधवी यांनी याचिका केली होती. वाढीव नुकसानभरपाई देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. न्या. अरुण पेडणेकर यांच्या एकल पीठाने माधवी यांची मागणी मान्य केली. अपघातानंतर माधवी यांना झालेल्या शारीरीक वेदना, उपचार खर्च, प्रवास भाडे, स्पेशल डायटसह अन्य खर्चाची बेरीज करून न्यायालयाने माधवी यांना 83 लाख 40 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.

काय आहे प्रकरण

अपघात झाला तेव्हा त्या एका रुग्णालयात सेवा देत होत्या. त्यांना 8 हजार 200 रुपये स्टायपेंड म्हणून मिळत होते. माधवी यांनी 8 लाख 20 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करत प्राधिकरणाकडे अर्ज केला. माधवी यांना अंधत्व आले आहे. त्या नीट वाचू शकत नाहीत. रस्ता क्रॉस करू शकत नाहीत. डॉक्टरी पेशावर याचा परिणाम झाला आहे. त्यांच्या उत्पन्नावर केवळ दहा टक्केच गदा आली आहे, असे निरीक्षण प्राधिकरणाने नोंदवले. त्यावर आक्षेप घेत माधवी यांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

न्यायालयाचे निरीक्षण

अंधत्व आल्याने माधवी रुग्णांवर उपचार करू शकत नाहीत. ही बाब वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाली आहे. माधवी यांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे. माधवी यांचे केवळ दहा टक्के उत्पन्न बाधित झाले आहे हा प्राधिकरणाचा निष्कर्ष रद्द केला जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले.