अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा द्या, हायकोर्टाचे पोलिसांना आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी सोमवारपर्यंत निर्जन जागा उपलब्ध करून द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी पोलिसांना दिले. त्यावर जागा निश्चित करून देण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील, अशी हमी सरकारी वकिलांनी दिली.

मुंब्रा बायपास रोडवर सोमवारी संध्याकाळी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला. तथापि, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नसून त्याची हत्या झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करीत अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. अक्षयच्या मृतदेहावर अद्याप अंत्यसंस्कार केलेले नाहीत. त्याच्या दफनविधीसाठी जागा देण्यास स्थानिक रहिवाशी विरोध करताहेत, असा दावा करीत अक्षयच्या वडिलांनी शुक्रवारी पुन्हा न्यायालयात अर्ज केला. त्यांच्यातर्फे अॅड. अमित कटारनवरे यांनी बाजू मांडली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने अक्षय शिंदेच्या वडिलांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी तातडीने निर्जन जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलिसांना दिले. याप्रकरणी सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे.

दफनविधीसाठी फक्त पोलीस, कुटुंबीयांना मुभा

स्थानिक लोकांच्या भावना तीव्र असल्याने दफनविधीवेळी केवळ कुटुंबीय व पोलिसांना हजर राहण्यास मुभा असू द्या, असा युक्तिवाद मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी केला. त्यांची विनंती मान्य करीत खंडपीठाने पोलीस आणि कुटुंबीयांच्या हजेरीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचे निर्देश दिले.