
गद्दार गीतावरून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मिंधे गटाकडून धमक्या येत असून, कुणालच्या जिवाला धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी देण्यासाठी तीनदा लेखी अर्ज केला; मात्र पोलीस कुणालचे म्हणणे नोंदवण्यास उत्सुक नाहीत. तर त्याला येथे शारीरिकरीत्या आणण्यास अधिक उत्सुक असल्याचा दावा कुणालच्या वकिलांनी आज हायकोर्टात केला. न्यायालयाने या युक्तिवादाची गंभीर दखल घेत मिंधे गटासह पोलिसांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
कुणालच्या गद्दार गीतावरून बिथरलेल्या मिंधे गटाने कुणालला कोंडीत पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. मिंधे गटाच्या मुरजी पटेल याने याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात कुणालविरोधात गुन्हा दाखल केला आहे आहे.
हत्येचा गुन्हा नाही
मुंबईत कुणालला घेऊन येण्यासाठी ठाम असलेल्या राज्य सरकारविरोधात युक्तिवाद करताना अॅड. नवरोज सिरवई यांनी सांगितले की, कुणाल कामराने हत्येचा गुन्हा केलेला नाही, तर एका स्टँडअप कॉमेडी शोमधून दाखल झालेला हा एफआयआर आहे. कामरा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पोलिसांना चौकशीत सहकार्य करण्यास तयार आहे.