अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धोत्रे यांनी लोकसभा निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून विजय मिळवला, असा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर नागपूर खंडपीठाने धोत्रे यांना नोटीस बजावली.
गोपाल चव्हाण यांनी धोत्रे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख रुपये इतकी होती, मात्र धोत्रे यांनी वाढीव खर्च लपवून ठेवला आणि निवडणूक आयोगाची दिशाभूल केली, असा आरोप याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांनी केला आहे. धोत्रे यांना 2 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
खासदार अनुप धोत्रे यांनी स्वतः 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हा एकूण खर्च त्यांनी 87 लाख 72 हजार 932 एवढा दाखवला आहे. प्रत्यक्षात मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.