
नवी मुंबईतील क्विन्स नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गालगत सर्व्हिस रोड बांधण्यात येत असून या सर्व्हिस रोडला आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पर्यावरणाचे नुकसान करून बिल्डरच्या फायद्यासाठीच हा सर्व्हिस रोडचा घाट घातला जात आहे, असा दावा आज याचिकाकर्त्यांनी केला. न्यायालयाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला.
नवी मुंबईतील महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीचलगत चाणक्य सिग्नल ते नेरुळ प्लॉट 7 दरम्यान सर्व्हिस रोड बांधण्यात येणार आहे. या सर्व्हिस रोडमुळे पाम बीच मार्गावरील वाहतूक आणखी सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र या प्रकल्पाच्या आड येणारे कांदळवन तोडले जाणार असून त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. याशिवाय न्यायालयाने झाडे न तोडण्यासंदर्भात आदेश दिले होते, मात्र त्याचे पालन केले न गेल्याने हायकोर्टात दीपक सेहगल यांनी अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. सुभाष झा यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, गरज नसताना विकासकाच्या फायद्यासाठी हा सर्व्हिस रोड बांधला जात आहे तर हा सर्व्हिस रोड अनेक झाडांच्या मुळावर उठणार आहे.
पालिका म्हणते, नियमांचे उल्लंघन नाही
नवी मुंबई पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, या कामासाठी एमसीझेडएमए व पर्यावरणाच्या विविध परवानग्या घेतल्या असून कायद्याचे कोणतेही उल्लंघन केलेले नाही. न्यायालयाने इतर प्रतिवाद्यांचे युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला.