
बांगलादेशींना बार्शी येथे राहण्यास मदत करणाऱ्या महिलेचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. राणी ऊर्फ विद्याराणी बसवराज पाटील हिच्यावर बांगलादेशींना हिंदुस्थानात राहण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. तिचे साथीदार फरार आहेत. पोलीस तपासासाठी या महिलेची कोठडी आवश्यक आहे, असे नमूद करत न्या. राजेश पाटील यांच्या एकलपीठाने राणीचा अटकपूर्व जामीन फेटाळला.
बार्शी येथे अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली. विशाल मांगले, किरण परांजपे व राणी यांनी या बांगलादेशींना येथे राहण्यासाठी मदत केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. गुन्हा नोंदवल्यापासून मांगले व परांजपे फरार आहेत. हा मोठा कट असू शकतो. त्यासाठी राणीची कोठडीची आवश्यकता आहे. त्यामुळे तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावावा, अशी मागणी पोलिसांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.