कारागृहात प्रसूतीमुळे आई, बाळावर विपरीत परिणाम; आरोपी महिलेला मंजूर केला सहा महिन्यांचा जामीन

कारागृहात प्रसूती झाल्यास आई व बाळावर तेथील वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका महिला आरोपीला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.

सुरभी सोनी असे या आरोपी महिलेचे नाव आहे. अमली पदार्थ बाळगल्याचा या महिलेवर आरोप आहे. गरोदर असल्याने तिने जामिनासाठी याचिका केली होती. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांच्या एकल पीठाने सोनीला 50 हजार रुपयांचा अंतरिम जामीन सहा महिन्यांसाठी मंजूर केला.

मानवतेचा दृष्टिकोन ठेवायला हवा

प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. परिस्थितीनुसार हा सन्मान मिळायलाच हवा. कारागृहात प्रसूती झाल्यास तेथील वातावरणाचा विपरीत परिणाम आई व बाळावर होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून सोनीला जामीन द्यायला हवा, असे न्यायालयाने नमूद केले.

तपास पूर्ण झालाय

सोनीवरील आरोपांचा तपास पूर्ण झाला आहे. तिला जामीन मंजूर केल्यास खटल्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तिची याचिका मंजूर केली जात आहे, असे नागपूर खंडपीठातील न्या. जोशी-फाळके यांनी स्पष्ट केले.

z गोंदिया रेल्वे पोलिसांनी सोनीसह पाच प्रवाशांना ताब्यात घेतले होते. या सर्वांकडे अमली पदार्थ सापडले होते. एप्रिल-2024 मध्ये आरोपींना अटक झाली. अटक झाली तेव्हा सोनी दोन महिन्यांची गरोदर होती. बाळाची प्रसूती कारागृहाबाहेर करायची आहे. त्यासाठी सहा महिन्यांचा जामीन द्यावा, अशी मागणी सोनीने केली होती.