प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्ये प्रकरणात उच्च न्यायालयाने गँगस्टर छोटा राजनला बुधवारी एक लाखाचा जामीन मंजूर केला. विशेष न्यायालयाने त्याला ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही न्यायालयाने स्थगिती दिली. असे असले तरी अन्य गुह्यातील खटले प्रलंबित असल्याने छोटा राजनचा मुक्काम तिहार जेलमध्ये असणार आहे.
या हत्ये प्रकरणी मे-2024मध्ये विशेष न्यायालयाने छोटा राजनला दोषी धरले व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याविरोधात त्याने अपील याचिका केली आहे. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या अपील याचिकेवर सुनावणी झाली. अपिलावर सुनावणी होईपर्यंत शिक्षेला स्थगिती द्यावी व जामीन मंजूर करावा, अशी मागणी छोटा राजनच्यावतीने करण्यात आली.
काय आहे प्रकरण
मुंबई सेंट्रल येथील गोल्डन क्राऊन हॉटेलचा मालक जया शेट्टीची 4 मे 2001 रोजी हत्या झाली. ही हत्या छोटा राजन टोळीच्या गुंडांनी केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. छोटा राजनचा हस्तक हेमंत पुजारीने शेट्टीला खंडणीसाठी फोन केला होता. खंडणी न दिल्याने शेट्टीची हत्या करण्यात आली, असाही पोलिसांचा दावा आहे.