आप्पासाहेब देशमुख यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर

सातारा जिह्यातील मायणी मेडिकल कॉलेजचे माजी संचालक आप्पासाहेब देशमुख यांना अखेर उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. आपल्याला राजकीय सूडभावनेतून ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली, असा दावा करीत देशमुख यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. ते मागील 29 महिने तुरुंगात कैद होते. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने देशमुख यांना 3 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश दिले. पीएमएलएअंतर्गत खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नसतानाही आप्पासाहेब देशमुख यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवले, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशपत्रात नोंदवले. त्यामुळे या निर्णयाने राजकीय सूडभावनेने कारवाई करणाऱ्या ईडीला पुन्हा एकदा मोठा झटका बसला.