एअर इंडियाच्या लांब अंतराच्या हवाई मार्गांवर उड्डाण घेणाऱ्या भाडेतत्त्वावरील बोईंग 777-200 एलआर विमानांच्या सुरक्षा प्रणालीचा आढावा घ्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने नागरी उड्डाण महासंचालनालयाला (डीजीसीए) दिले आहेत. वैमानिकाने बोईंग विमानांच्या सुरक्षा प्रणालीबाबत चिंता व्यक्त करीत याचिका दाखल केली आहे.
हिंदुस्थान-अमेरिकादरम्यानच्या काही मार्गांवर एअर इंडियाच्या भाडेतत्त्वावरील बोईंग विमानांची सेवा सुरू आहे. एअर इंडियाने नोव्हेंबर 2022 मध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या या बोईंग विमानांत ठरावीक मार्गांसाठी पुरेसा ऑक्सिजन पुरवठा नाही, असा दावा याचिकाकर्त्या वैमानिकाने केला आहे. हा मुद्दा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असल्याचे मत न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावाला आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपीठाने नोंदवले. हे प्रकरण केवळ दोन पक्षकारांतील वादाचे नाही, तर त्यात उड्डाण सुरक्षा व विमान प्रवाशांची सुरक्षा यांसारख्या व्यापक सामाजिक मुद्द्यांचा अंतर्भाव आहे, असेही खंडपीठाने नमूद केले.
एअर इंडियाने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बोईंग विमानांत 12 मिनिटांच्या आपत्कालीन ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था आहे. तथापि, हे विमान 12 मिनिटांत 10 हजार फूट उंचीवरून नियोजित ठिकाणी सुरक्षित उतरू शकते का? याचा विचार डीजीसीएने करावा, असे न्यायालयाने सूचित केले आणि वैमानिकाची याचिका निकाली काढली.
कोर्टाने आदेशपत्रात काय म्हटलेय?
- ‘फ्लाईट क्रू ऑपरेटिंग मॅन्युअल’ आणि ‘फ्लाईट प्लॅनिंग अॅण्ड परफॉर्मन्स मॅन्युअल’नुसार बोईंग विमानामध्ये 12 मिनिटांपेक्षा अधिक काळ पुरेल अशा प्रकारे सर्व क्रू मेंबर्स आणि प्रवाशांसाठी ऑक्सिजन साठा ठेवणे आवश्यक आहे.
- अधिक उंचीवरून उड्डाण घेणाया लांब पल्ल्याच्या विमानांसाठी पुरेसा ऑक्सिजन साठा बंधनकारकच आहे. विमानात अचानक हवेचा दाब कमी झाला तर 10 हजार फूट उंचीवरून अवघ्या 12 मिनिटांत खाली उतरणे शक्य होणार नाही.
- लांब पल्ल्याच्या हवाई अंतरावरील विमानांत पुरेसा ऑक्सिजन साठा न ठेवणे हे प्रवासी सुरक्षा नियमावलीचे उल्लंघन आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून डीजीसीएने एअर इंडियाच्या बोईंग विमानांच्या सुरक्षा प्रणालीचा आढावा घ्यावा.