जवानाच्या आईची 2010 पासून रोखलेली पेन्शन व्याजासकट द्या! हायकोर्टाचे बीएसएफला निर्देश

जवानाच्या निधनानंतर त्याच्या पश्चात दिली जाणारी पेन्शन रोखल्या प्रकरणी हायकोर्टात धाव घेतलेल्या आईला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सुनेच्या दुसऱ्या विवाहानंतर आईवडील हे पेन्शनचे हक्कदार असल्याचे स्पष्ट करत जुलै 2010पासून रोखण्यात आलेली पेन्शन सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश न्यायालयाने बीएसएफला दिले.

दत्तात्रय कोळेकर हे बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांचे 5 एप्रिल 2008 रोजी निधन झाले. निधनानंतर दत्तात्रय यांची पेन्शन त्यांची पत्नी व आई आणि वडिलांना मिळत असे. मात्र दत्तात्रय यांच्या पत्नीने दुसरा विवाह केला तसेच त्या एका ठिकाणी कामावर रुजू झाल्या. त्यामुळे बीएसएफने कौटुंबिक पेन्शन देणे थांबवले. पेन्शन मिळावी यासाठी दत्तात्रय यांच्या आईने हायकोर्टात दाद मागितली. अॅड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत त्यांनी याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी दत्तात्रय यांच्या पत्नीने सासू आणि सासऱ्यांना पेन्शन देण्याबाबत आपली काहीच हरकत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने याची दखल घेत बीएसएफला दत्तात्रय यांच्या आईवडिलांची थकित पेन्शन सहा टक्के व्याजाने देण्याचे निर्देश देत याचिका निकाली काढली.