पर्युषण पर्वकाळातील मांसविक्री बंदीबाबत तातडीने निर्णय घ्या; उच्च न्यायालयाचा महापालिकांना आदेश

जैन धर्मीयांच्या ‘पर्युषण पर्व’ सणाच्या काळात पशुबळी आणि मांसविक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या निवेदनांवर तातडीने निर्णय घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्यातील सर्व महापालिकांना दिले. 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या काळात पर्युषण पर्व साजरे केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले.

पुण्यातील ‘शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीज’ या चॅरिटेबल ट्रस्टने पर्युषण काळात पशुबळी व मांसविक्रीवर बंदी घालण्यासाठी विनंती केली होती. मात्र स्थानिक प्रशासनांनी तात्पुरत्या बंदीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे ट्रस्टने जनहित याचिका दाखल केली. याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र पुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी ट्रस्टतर्फे अॅड. बी. एन. चॅटर्जी यांनी युक्तिवाद केला. जैन धर्मात अहिंसा महत्त्वपूर्ण सिद्धांतांपैकी एक आहे. पर्युषण काळात पशुबळी व मांसविक्री सुरू ठेवली तर जैन धर्मीयांना प्रतिपूल वातावरण बनेल, असे म्हणणे त्यांनी मांडले. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने मुंबई, पुणे, मीरा-भाईंदरसह सर्व पालिकांना ट्रस्टच्या निवेदनांवर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. पालिकांनी स्वतंत्रपणे व कायद्याला धरून निर्णय घ्यावा, असेही खंडपीठाने नमूद केले.