
कार हल्ला प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल हिला दिलासा देण्यास हायकोर्टाने आज नकार दिला. क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या आरोपात तथ्य असून प्रथमदर्शनी पुरावे पाहता खटला रद्द करण्यासाठी सपना गिल हिने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास इच्छुक नसल्याचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने आज स्पष्ट केले.
गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी इन्फ्लुएन्सर सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी पृथ्वी शॉकडे सेल्फी मागितला. मात्र पृथ्वीने सेल्फी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या गाडीवर हल्ला करण्यात आला तसेच 50 हजार रुपयांची मागणी करत पैसे न दिल्यास खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी शॉचा मित्र आशीष यादव याने इन्फ्लुएन्सर सपना गिलविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गिल आणि इतरांना अटक केली होती. गिलने तिच्याविरुद्ध दाखल केलेले आरोप रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली असून न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर आज गुरुवारी यावर सुनावणी घेण्यात आली.
न्यायालय काय म्हणाले…
- एफआयआरमध्ये गुह्याचा स्पष्टपणे उल्लेख असून प्रथमदर्शनी असे दिसून येते की, याचिकाकर्त्याविरोधात पोलिसांकडे पुरावे आहेत, हे आरोप आम्ही रद्द करणार नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सत्र न्यायालयात दोष मुक्ततेसाठी याचिका दाखल करण्याचा विचार करावा.
- त्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील जेपी याज्ञिक यांना पुनरावलोकनासाठी आरोपपत्राची प्रत देण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी 3 एप्रिलपर्यंत तहकूब केली.