अंथरुणात खिळलेल्या आजींना रुग्णालयात बोलावणे भोवणार, हायकोर्टाने ससून रुग्णालयाकडून मागितला खुलासा; घरी जाऊन तपासणी करण्याचे होते आदेश

अंथरुणात खिळलेल्या आजींना तपासण्यासाठी रुग्णालयात बोलावल्याने उच्च न्यायालयाने पुण्यातील ससून रुग्णालयावर तीव्र संताप व्यक्त केला. आजींची घरी जाऊन तपासणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही तुम्ही त्यांना रुग्णालयात का बोलावलेत, याचा खुलासा प्रतिज्ञापत्रावर करण्याचे आदेश न्यायालयाने येथील अधिष्ठाता यांना दिले आहेत.

न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. आजींना तपासणीसाठी रुग्णालयात बोलावण्याचे आदेश कोणाचे होते हे अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरांनादेखील माहिती नाहीत. त्यामुळे याचे स्पष्टीकरण अधिष्ठाता व संबंधित डॉक्टरांनी 5 एप्रिल 2025 पर्यंत द्यावे, असे आदेश देऊन न्यायालयाने ही सुनावणी 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली.

अत्यंत दुःखद, धक्कादायक  

आजी आजारी आहेत म्हणूनच आम्ही त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे एक पथक तयार करण्याचे आदेश दिले होते. आजींची घरी जाऊन तपासणी करा व त्याचा अहवाल सादर करा, असेही आदेशात नमूद केले होते. तरीही आजींना तब्बल 19 किमीचा प्रवास करून रुग्णालयात तपासणीसाठी बोलावण्यात आले हे अत्यंत दुःखद व धक्कादायक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

तपासणी अहवालासाठी मुदतवाढ 

आजींची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी डॉक्टरांच्या समितीने चार दिवसांची मुदत मागितली. ते न्यायालयाने मान्य केले. तसेच घरापासून ससून रुग्णालय किती अंतरावर आहे, तेथे जाण्यासाठी किती वेळ लागतो, याची माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने आजींच्या नातलगांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण 

या आजींचा पालक म्हणून नियुक्त करण्यासाठी मुलीने याचिका केली आहे. आजारपणामुळे आजी अंथरुणात खिळलेल्या आहेत. त्यांना दैनंदिन काम करता येत नाही. त्यांचे अन्य व्यवहार हाताळण्यासाठी माझी पालक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी मुलीने याचिकेत केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने या आजींची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.