हुंडाबळी म्हणजे पत्नीची हत्याच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

हुंडाबळी म्हणजे पत्नीची हत्याच असते. या गुह्यासाठी शिक्षा झालेल्या पतीला मृत पत्नीची संपत्ती मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.

हा निर्वाळा देत न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या एकल पीठाने मृत पत्नीच्या वडिलांची याचिका मंजूर केली. हुंडय़ाचा वाद माझ्या मुलीच्या जीवावर बेतला. हुंडाबळीसाठी पती व त्याच्या आईवडिलांना शिक्षा झाली आहे. ते सध्या उत्तर प्रदेश कारागृहात शिक्षा भोगत आहेत. माझ्या मुलीच्या मालमत्तेवर त्यांनी हक्क सांगितला. हा हक्क मंजूर झाला. माझ्या मुलीची संपत्ती पती व त्याच्या आईवडिलांना देण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण

हत्येसाठी शिक्षा झालेल्या आरोपीला मृताच्या मालमत्तेचा हक्क दिला जात नाही. तशी तरतूद हिंदू वारसा हक्क कायद्यात आहे. त्यानुसार पतीच्या व त्याच्या आईवडिलांचा मृत पत्नीच्या मालमत्तेवरील दावा मान्य करण्यात आला. कारण त्यांना हुंडाबळी कायद्यांतर्गत शिक्षा झाली होती. याला मृत पत्नीच्या वडिलांनी विरोध केला होता. हुंडाबळीसाठी शिक्षा झालेल्या आरोपीला मृत पत्नीच्या मालमत्तेचे अधिकार देता येतील का, या मुद्दय़ावर न्यायालयाने सुनावणी घेतली.

न्यायालयाचे निरीक्षण

हत्येची व्याख्या हिंदू वारसा हक्क कायद्यात करण्यात आलेली नाही. आयपीसी कलम 302 अंतर्गत हत्येसाठी शिक्षा दिली जाते. कलम 300 अंतर्गत हत्येची व्याख्या आहे. आयपीसी व हिंदू वारसा हक्क कायद्याचा एकाच स्तरावर विचार केला जाऊ शकत नाही. हुंडाबळी व हत्येच्या शिक्षेची तुलना करता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

टेस्टमेंटरी विभागाचा युक्तिवाद फेटाळला

संबंधित पतीला हुंडाबळीसाठी शिक्षा झाली. म्हणून त्याचा मृत पत्नीच्या मालमत्तेवरील दावा मान्य केला हा टेस्टमेंटरी विभागाचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला.