राजस्थानमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानच्या ड्रोनने घडसाना भागात शिरकाव केल्यानंतर सीमा सुरक्षा दल अलर्ट मोडवर आहे. धुक्याचे साम्राज्य पसरल्याने आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेतली जात आहे. मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवरील श्रीगंगानगर आणि बिकानेर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अमली पदार्थांची तस्करी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. शस्त्रास्त्र तस्करीच्या सततच्या प्रकरणांमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. गुरुवारी या परिसरात हिंदुस्थानच्या हद्दीत 100 मीटर आत दोन ‘मेड इन यूएस’ पिस्तूल सापडले. दरवर्षी 26 जानेवारीच्या दहा ते बारा दिवस आधी चोख बंदोबस्त ठेवला जातो. सुमारे 15 दिवसांच्या या अलर्टमध्ये सीमेवर सैन्य, शस्त्रs आणि सुरक्षा उपकरणांची संख्या तीनपटीने वाढवण्यात आली आहे. राखीव जवान, बटालियन आणि सेक्टर मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी सीमेवर तैनात आहेत. ऑपरेशन ‘सर्द हवा’ सुरू होण्यास अजून पाच दिवस बाकी आहेत.