
इस्रायल व लेबनॉन यांच्यातील युद्धाचा भडका चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलने शनिवारी लेबनॉनवर प्रचंड क्षमतेचा हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हिजबुल्लाहचे कमांड सेंटर उद्ध्वस्त झाले आहे. तसेच अनेक नागरिकांचे बळी गेले असून जखमींचा आकडाही शेकडोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलच्या सैन्याने हवाई हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आपल्या सैन्याने तोफखाना आणि हवाई हल्ल्याच्या माध्यमातून लेबनॉनच्या दक्षिण भागावर निशाणा साधल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे
इस्रायल आणि लेबनॉनचा सशस्त्र गट असलेल्या हिजबुल्लाह यांच्यात मागील वर्षभरापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने एकीकडे प्रयत्न चालले असतानाच इस्रायलच्या सैन्याने शनिवारी लेबनॉनवर जोरदार हवाई हल्ला केल्यामुळे युद्धविरामच्या आशा मावळल्या आहेत. याउलट युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लेबनॉनकडून पाच रॉकेट डागण्यात आले. त्यापैकी तीन रॉकेट आमच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पाडल्याचे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. मात्र हिजबुल्लाहने रॉकेट डागण्यामागे आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. आपण युद्धविरामच्या प्रयत्नांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट करीत हिजबुल्लाहने रॉकेट हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.