अर्जेंटिनाचा वेगवान गोलंदाज हर्नान फेनेलने केमॅन आयलॅण्ड्सच्या विरुद्ध आयसीसी टी-20 वर्ल्ड कप अमेरिकन पात्रता फेरीच्या सामन्यात सलग चार चेंडूंवर चार विकेट टिपण्याचा पराक्रम करत डबल हॅटट्रिकची नोंद केली. मात्र या विक्रमानंतरही अर्जेंटिनाला केमॅन आयलॅण्ड्सविरुद्ध 22 धावांनी हार सहन करावी लागली. या सामन्यात फेनेलने केलेल्या कामगिरीमुळे पुरुषांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डबल हॅटट्रिक टिपणारा तो सहावाच गोलंदाज ठरला आहे.
याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात अफगाणी फिरकीवीर राशीद खान, श्रीलंकन वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, आयर्लंडचा अष्टपैलू कर्टिस पॅम्फर, विंडीजचा जेसन होल्डर आणि लेसोथोचा वसीम याकुबर या गोलंदाजांनी सलग चार चेंडूंवर चार विकेट घेत डबल हॅट्ट्रिकचा पराक्रम केला आहे.
केमॅन आयलॅण्ड्स संघाने 20 षटकांत 116 धावा केल्या होत्या. या धावसंख्येत फेनेलने सामन्याच्या शेवटच्या षटकात 6 बाद 116 अशा स्थितीत असलेल्या संघाला सर्व बाद 116 अशा स्थितीत पोहोचवले. त्याने 14 धावांत 5 विकेट टिपल्या. त्यानंतर 117 धावांचा पाठलाग करताना अर्जेंटिनाचा डाव 16.5 षटकांत 94 धावांवरच आटोपला.