हेमंत सोरेन यांचा थोड्याच वेळात शपथविधी, राज्यपाल देणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हेमंत सोरेन आज पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता म्हणजे थोड्याच वेळात राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देतील. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गुरुवारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले.

विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जेएमएमच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीने हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड केली. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

कथित जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हेमंत सोरेन पाच महिने तुरुंगात होते. गेल्या आठवड्यातच झारखंड हायकोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. आता ईडी झारखंड हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.