हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्री होणार; ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चिन्हे आहेत. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हेमंत सोरेन पाच महिने तुरुंगात होते. गेल्या आठवड्यात 28 जून रोजी सोरेन यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने जामीन मंजूर केला. हेमंत सोरेन यांच्या सुटकेनंतर ते पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ‘इंडिया’ आघाडीची बुधवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यावर एकमत झाले आहे. यामुळे हेमंत सोरेन यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेमंत सोरेन तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात पक्षाची ही पहिलीच बैठक पार पडली. झारखंडचे राज्यपाल सध्या राज्याबाहेर आहेत. ते परत येईपर्यंत सर्व आमदार मुख्यमंत्री निवासस्थानी राहणार आहेत. संध्याकाळी उशिरापर्यंत राज्यपाल परतण्याची शक्यता आहे. राज्यपाल परत आले की विद्यमान मुख्यंमंत्री चंपई सोरेन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. चंपई यांना नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

विद्यमान मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आले आहे. चंपई यांच्या भेटीसाठी आलेल्या लोकांना त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगून माघारी पाठवण्यात आले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर 2 फेब्रुवारी 2024 रोजी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.