हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होणार आहेत. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज सायंकाळी राज्यपालांकडे सोपवला तर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला. दरम्यान, चंपाई सोरेन पाच महिने झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी राहीले. हेमंत सोरेन यांनी सर्व आमदारांचे समर्थन असलेले पत्रही राज्यपालांना दिले असून आता राज्यपाल त्यांना कधीही सत्तास्थापनेसाठी पाचारण करू शकतात.

मुख्यमंत्री निवासस्थानी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची आज बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी हेमंत सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सर्व आमदारांना मुख्यमंत्री निवासस्थानीच ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी अखेरच्या क्षणी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बैठकीला हजेरी लावली. हेमंत सोरेन हे मंगळवारपासून मुख्यमंत्री निवासस्थानी आहेत.

– जमीन घोटाळय़ाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. मात्र त्यांच्याविरोधात पुरावे नाहीत असे सांगत उच्च न्यायालयाने त्यांना 28 जून रोजी जामीन मंजूर केला होता. त्याच दिवशी सोरेन यांची कोठडीतून सुटका झाली होती.