हेमंत सोरेन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

झारखंड हायकोर्टाने ईडीला सणसणीत चपराक लगावत जामिनावर मुक्त केलेल्या हेमंत सोरेन यांनी आज पुन्हा झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ईडीने दाखल केलेल्या गुह्यांमध्ये हेमंत सोरेन यांचा काडीमात्र संबंध आढळून आलेला नाही, असे सुनावत हायकोर्टाने हेमंत सोरेन यांना 28 जून रोजी जामीन मंजूर केला होता.

येथील राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी सोरेन यांचे वडील आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन, त्यांची आई रुपी सोरेन, त्यांची पत्नी कल्पना सोरेन आणि झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन हेमंत यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा करणारे चम्पाई सोरेनही यावेळी उपस्थित होते.

हेमंत सोरेन यांनी 31 जानेवारी रोजी ईडीने अटक करण्याआधी काही तास मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाने सूत्रे झामुमोचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवली होती.

सत्याचा विजय होतोच…
विरोधकांनी माझ्याविरुद्ध कट रचला होता. त्यामुळे पाच महिने मला तुरुंगात घालवावे लागले, अखेरीस मला न्याय मिळाला. दैवी योजनांमध्ये विलंब होऊ शकतो, पण शेवटी सत्याचा विजय होतोच, असे त्यांनी याबद्दल एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.