आळंदीत संजीवन समाधी सोहळ्यात गहिवरला वैष्णवांचा सागर

‘माऊली माऊली…’ नामाच्या गजरात, पुष्पवृष्टी, घंटानाद करत आज तीर्थक्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 728वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पहाटे तीन वाजता प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक झाला. सकाळी सात ते नऊ वाजता हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे कीर्तन झाले. नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले. यावेळी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.

कीर्तनात केशव नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले.