केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे उत्तराखंडमधील पिठोरागड येथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. या हेलिकॉप्टरने राजीव कुमार हे मिलमच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत उपमुख्य निवडणूक अधिकारी विजयकुमार जोगदंडे हे देखील हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते.
मुख्य निवडणूक आयुक्तांना घेऊन हे हेलिकॉप्टर पिठोरागडहून मिलमच्या दिशेने निघाले होते. मिलम येथून ते कॅम्प ट्रेकिंगसाठी जाणार होते. मात्र दुपारी एकच्या सुमारास अचानक हवामान बिघडले आणि हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅण्डिंग करावे लागले. राजीव कुमार आणि इतर सहकारी सुखरूप असल्याचे कळते. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, राजीव कुमार हे देशाचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी 15 मे 2022 रोजी पदभार स्वीकारला होता आणि 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत ते या पदावर राहणार आहेत.
राजीव कुमार यांनी बीएससीसोबतच एलएलबी, पीजीडीएम आणि एमएचे शिक्षण घेतलेले आहे. 1984 च्या बॅचचे ते आएएस अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीसह 2024 ची लोकसभा निवडणूक आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. नुकतीच त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या.