मुंबईत पावसाळ्यात चौपाटय़ांवर कडक सुरक्षा  

या वर्षी पावसाळ्यात समुद्राला 22 वेळा मोठे उधाण येणार असून त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिकेने सहा मोठय़ा चौपाटय़ांवर विशेष सुरक्षा ठेवली आहे. यात पोलीस, लाईफ गार्ड, फायर ब्रिगेडचे जवान तैनात असणार आहेत. पण त्याचबरोबर चौपाटय़ांवरून समुद्रात खोलवर आत कोणी जाऊ नये, यासाठी इशारा म्हणून लाल झेंडा फडकणार असून भरतीच्या वेळी पर्यटकांना अलर्ट करण्यासाठी सायरनही वाजवण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी चौपाटय़ांवर फायर इंजिन तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. दरम्यान, भरती ओहोटीच्या वेळी कोणी समुद्रकिनारी चौपाटय़ांवर जाऊ नये, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.