उत्तर प्रदेशात पावसाचे धुमशान, 11 जणांचा मृत्यू; देशभरात 18 राज्यांमध्ये जोरदार बरसणार!

उत्तर प्रदेशात पावसाने तीन दिवसांपासून धुमशान घातले असून 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 जणांचा बुडून, तर 5 जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. हमीरपूर जिल्ह्यात सर्वाधिक 164 मिमी पावसाची नोंद झाली असून मुरादाबादसह अनेक ठिकाणी रेल्वे रुळाखाली पाणीच पाणी झाले. यादरम्यान केंद्रीय हवामान विभागाने देशभरात 18 राज्यांमध्ये पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. जनजीवन विस्कळीत झालेल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, तर 21 जिल्ह्यांमध्ये आँरेज अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशात आठवडाभरापासून गोरखपूर जिल्ह्यातील राप्ती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या भागात 55 गावे पाण्याखाली गेली असून 30 हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. गेल्या सात दिवसांपासून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. दुसरीकडे लखीमपूर खेरीमध्ये नद्यांना उधाण आल्याने महामार्गापर्यंत पाणी पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने आतापर्यंत कुठल्याही ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही.

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, मध्य प्रदेशातील बैतुल येथील बरबतपूर रेल्वे स्टेशनजवळ मचना नदीवर बांधलेला अप ट्रॅक बुडाला आहे. केंद्रीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा राज्यांत अतिवृष्टी होईल असे सांगितले. तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा, मेघालय, केरळ, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि कर्नाटकात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.