खूशखबर…दोन दिवसांत पाणीकपात रद्द ? तलाव अर्धे भरले; चिंता मिटतेय

मुंबईकरांना पाणीपुरवठा होणाऱया तलाव क्षेत्रात होणाऱया दमदार पावसामुळे सात तलावांत मिळून सध्या 6,84,440 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पाहता हे पाणी पुढील 177 दिवसांना पुरणारे म्हणजेच मार्चपर्यंत पुरणारे जमा झाले आहे. यातच हवामान खात्याकडून पुढील चार दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशाराही दिला आहे. त्यामुळे सध्या वाढणारा पाणीसाठा पाहता मुंबईत 5 जूनपासून सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात दोन दिवसांत रद्द करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी आयुक्तांकडे जल विभागाची दोन दिवसांतच निर्णायक बैठक होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. याआधी पवई तलाक 8 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला. पवई तलाकाचे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामासाठी वापरण्यात येते, तर शनिवार, 20 जुलै रोजी तुळशी तलाव ओव्हर फ्लो झाला. धरण क्षेत्रात पावसाची अशीच दमदार बॅटिंग सुरू राहिली तर लवकरच मुंबईकरांवरील 10 टक्के पाणीकपात रद्द होईल, असे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

 गेल्या तीन वर्षांची 22 जुलैची स्थिती

2024 – 684440 दशलक्ष लिटर – 47.29 टक्के

2023 – 668142 दशलक्ष लिटर – 47.54 टक्के

2022 – 1268657 दशलक्ष लिटर – 87.65 टक्के

असे भरले तलाव

अप्पर वैतरणा        30,712 दशलक्ष लिटर       13.83 टक्के

मोडक सागर            84,344 दशलक्ष लिटर       65.42 टक्के

तानसा         1,22,012 दशलक्ष लिटर 84.10 टक्के

मध्य वैतरणा           80,633 दशलक्ष लिटर       41.66 टक्के

भातसा         3,36,103 दशलक्ष लिटर 46.87 टक्के

विहार           22,589 दशलक्ष लिटर 81.86 टक्के

तुलसी          8,046 दशलक्ष लिटर 100 टक्के